भडगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा व महसूल विभागाचा संयुक्त छापा; ४२.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन डंपर आणि ११ ब्रास वाळू ताब्यात; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Spread the love

भडगाव (प्रतिनिधी: मुकेश कोळी): नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होताच अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलीस व महसूल विभागाने संयुक्त धडक कारवाई केली. या कारवाईत दोन डंपर आणि एकूण ११ ब्रास वाळू असा ४२ लाख ७८ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महसूल विभागाचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भडगाव पोलीस व महसूल विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

 

पहिल्या कारवाईत २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास गुढे (ता. भडगाव) येथे शासनाच्या मालकीची वाळू विनापरवाना चोरून वाहतूक करताना रघुनंदन एकनाथ पाटील (रा. कोठळी, ता. भडगाव) याला पकडण्यात आले. या कारवाईत सहा ब्रास वाळू आणि एक डंपर असा २१ लाख ५९ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दुसऱ्या कारवाईत २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.०५ वाजेच्या सुमारास बोदडे (ता. भडगाव) येथे विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी पाच ब्रास वाळू आणि एक डंपर असा २१ लाख १८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दोन्ही प्रकरणांत नायब तहसीलदार सुधीर किटकुळ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

 

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस व महसूल विभागाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; घेतलेले शासकीय लाभ...

जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख): दि. १६ नोव्हेंबर : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभागांत कार्यरत असलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर तातडीने बडतर्फी व निलंबनाची...

कानळदात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पारंपरिक...

कानळदा (प्रतिनिधी: इमरान खान): (ता. जळगाव) : येथील गावकऱ्यांच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि...

वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० हजारांची...

जळगाव: (प्रतिनिधी: आसमा शेख):वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या...

संपादक - रजत शेख

Latest