जळगाव (प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री तसेच जनावरांना ठार मारणे व त्यांना विकलांग करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. टोळीप्रमुख मुक्तार जमाल कुरेशी (वय ४५) आणि टोळी सदस्य परवीनबी मुक्तार कुरेशी (वय ४०, दोघे रा. ३६ खोल्या, फातेमा नगर, जळगाव) यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गोवंश कत्तल आणि अवैध मांस विक्रीला आळा घालण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा अवैध व्यवसायात सक्रिय असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग
संबंधित आरोपींविरुद्ध एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र पशुसंवर्धन व पशुसंरक्षण कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये २०२३ मधील एका गुन्ह्यासह २०२६ मध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईनंतर हद्दपारी
आरोपींविरुद्ध यापूर्वीही एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही आरोपींना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट इशारा मिळाला असून, अशा अवैध व्यवसायांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




