मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी):
मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन अँड्रॉइड मोबाईल, दोन मोटारसायकली आणि रोख रकमेसह एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून अन्य दोन जण मोटारसायकली सोडून पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एस. एस. कॉलेज परिसरात दोन मोटारसायकलींवरून पाच अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी पोलीस पथकाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले. मात्र, अन्य दोघे जण त्यांच्या मोटारसायकली घटनास्थळी सोडून पसार झाले.
आंध्र प्रदेशातील तिघे ताब्यात
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे मेकला प्रसन्नाकुमार मेकला दास, धरसिंगी देरध घोडीडी ऊर्फ प्रसिंग प्रसाद गुटेड्डी आणि मेकल विरास्वामी कोंडाया अशी आहेत. हे तिघेही आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पिस्तूल, काडतूस आणि रोख रक्कम जप्त
या कारवाईत एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि ५ हजार ३०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४७ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय १०५ लोखंडी छरे, एक स्क्रू ड्रायव्हर, दोन कापडी टोप्या, एक टी-आकाराचे टोकदार हत्यार आणि वेगवेगळ्या क्रमांकांच्या १० नंबर प्लेट्सही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
गंभीर गुन्ह्यांतील सहभागाची तपासणी
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचा अन्य ठिकाणी झालेल्या घरफोडी, चोरी किंवा दरोड्याच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच पसार झालेल्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल कल्पेश आमोदकर, असीम तडवी तसेच पोलीस अंमलदार रवींद्र धनगर, मुकेश महाजन, रितेश चव्हाण आणि गोविंदा पवार यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.








