मुक्ताईनगर (प्रतिनिधी: सतीश चव्हाण):शहरातील अक्सानगर परिसरातून चोरीला गेलेले ट टवेरा वाहन अमरावती शहरातील नवसारी परिसरातून शोधून काढण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मोहम्मद मुद्दसिर मोहम्मद युनूस (वय २८, रा. अकोला, सध्या रा. नवसारी, अमरावती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी ही कारवाई केली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाला वाहनाचा माग
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ ते ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून MH-19/BC-0092 क्रमांकाचे टवेरा वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी वाहनधारक शेख दानिश शेख साबीर यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ, शेगावमार्गे अमरावतीपर्यंत तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुक्ताईनगर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले. या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात वाहन भुसावळच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानंतर भुसावळ, कुऱ्हा पानाचे, जामनेर, पहूर, सिल्लोड आणि खामगाव येथील प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान वाहन शेगाव शहरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. तेथील फुटेज तपासले असता, वाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या पार्किंग परिसरात सुमारे पाच तास उभे असल्याचे आढळले. पुढील तपासात हे वाहन अमरावती शहरात गेल्याचे निष्पन्न झाले.
नवसारी परिसरात आरोपीला पकडले
अमरावती शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहनाचा पुढील माग न लागल्याने मुक्ताईनगर पोलिसांनी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली. अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे शोध घेतला असता, चोरीला गेलेले वाहन नवसारी परिसरात उभे असल्याचे आढळले.
पोलिसांनी वाहनावर पाळत ठेवली असता, काही वेळाने मोहम्मद मुद्दसिर मोहम्मद युनूस हा वाहनात बसलेला दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध अकोला शहरासह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार कल्पेश आमोदकर, पोलीस हवालदार असिम तडवी, पोलीस शिपाई मुकेश महाजन, रिलेश चव्हाण, स्वप्निल पवार आणि अक्षय वाढे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.








