जळगाव(प्रतिनिधी: आसमा शेख) : दि. १२ ऑक्टोबर : अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या दोघांच्या अटकेमुळे अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून दोघांना अटक
अमळनेर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या कारवाईत नवलसिंह वनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) याला तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अमळनेर येथे आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने साथीदार केरु उर्फ केहरु इडीया डाबर (वय ४५, रा. बलेडी, गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्यप्रदेश) याच्यासोबत अमळनेर शहरात घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्यानुसार अमळनेर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. पथकाने बलेडी गावातून दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणले आणि त्याला संबंधित गुन्ह्यात अटक केली.
तीन घरफोडीचे गुन्हे उघड
१) गुन्हा क्रमांक ३२/२०२६ : ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी अमळनेर शहराबाहेरील शेत परिसरात मोटारसायकल उभी केली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर नदीजवळील कॉलनीत जाऊन बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती तपासात समोर आली.
२) गुन्हा क्रमांक १५९/२०२६ : ३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रीट रस्त्याजवळील कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि तेथील सोने-चांदीचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
३) गुन्हा क्रमांक ४४६/२०२६ : २४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर आरोपींनी सिमेंट काँक्रीट रस्त्याजवळील कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटातून १० हजार रुपये रोख रक्कम, तसेच देवघरातील चांदीची गणपतीची मूर्ती आणि नक्षीकाम केलेले चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे चोरी केल्याची माहिती तपासात उघड झाली.
सोने-चांदीच्या दागिन्यांसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या तीन गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये चांदीची गणपतीची मूर्ती, लक्ष्मीचे चांदीचे नाणे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची गोळी, चांदीचे तुकडे, कड्या, करदोडे आणि वाळ्या यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के आणि नितीन कापडणे यांनी सहभाग घेतला. तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अमळनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.








