जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील मेहरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘पाठांतरातून प्रगती’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत २५० विद्यार्थ्यांना विशेष पाठांतर वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कविता, पाढे, श्लोक, सुविचार, प्रश्नोत्तरे, व्याख्या तसेच विविध विषयांतील महत्त्वाची माहिती नियमितपणे पाठ करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. पाठांतर केलेला भाग विद्यार्थ्यांनी वर्गासमोर आत्मविश्वासाने सादर करावा, तसेच त्याची नोंद पाठांतर वहीत करावी, अशी उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी दररोज केलेल्या पाठांतराची नोंद वहीत करायची असून शिक्षकांकडून त्याची नियमित तपासणी केली जाणार आहे. नियमित व उत्कृष्ट पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सन्मानही करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे.
‘दररोज थोडे पाठांतर, अभ्यासात मोठी भरारी!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. पाठांतर हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी केले असून मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून २५० विद्यार्थ्यांना पाठांतर वह्या उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘पाठांतराची सवय – अभ्यासाची गती – प्रगतीची नवी दिशा’ हा सकारात्मक संस्कार रुजविण्याचा शाळेचा मानस आहे.







