जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख) :जळगाव शहरातील निसार कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावला. या प्रकरणी असमतखा इलियास खा कुरेशी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून २८ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाला तपासासाठी सूचना दिल्या.
निसार कॉलनीत घरफोडी
३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान निसार कॉलनी, गट क्रमांक ३४७/२, प्लॉट क्रमांक २७/२ येथे राहणारे शेख अनिस शेख चाँद यांच्या घरात चोरी झाली होती. चोरट्याने चांदीच्या पायल्या, दोन पोत आणि चार हजार रुपये रोख असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात संशयिताचा शोध घेतला. यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार असमतखा इलियास खा कुरेशी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला.
चौकशीदरम्यान संशयिताने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपीकडून २८ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
गुन्हे शोध पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय सुनील पाटील, सहायक फौजदार दीपक शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी सहभाग घेतला.
जळगाव शहर पोलिसांच्या या कामगिरीमुळे घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळाला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.








