मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन) :विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण व्हावी, कष्ट, जिद्द, सातत्य आणि कौशल्याच्या माध्यमातून यशस्वी होता येते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘माझी यशोगाथा’ या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रचिती मीडियाचे संचालक तथा प्रिंटिंग व्यवसायातील उद्योजक सचिन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव कथन केले. व्यवसायाची सुरुवात, त्यातील आव्हाने, आलेल्या अडचणी, ग्राहकांचा विश्वास, गुणवत्तापूर्ण काम आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार या विविध पैलूंवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“यश मिळविण्यासाठी मेहनतीसोबतच नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे,” असा संदेश सचिन घुगे यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रिंटिंग क्षेत्रातील बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कौशल्यविकासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योजकता, व्यवसायाची सुरुवात, ग्राहक सेवा, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसायातील अडचणी याबाबत विविध प्रश्न विचारले. सचिन घुगे यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी व्यक्तींच्या जीवनप्रवासाची ओळख करून देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि उद्योजकतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ‘Vocal for Local’ संकल्पनेशी या उपक्रमाची सांगड घालत स्थानिक उद्योजकांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.
यावेळी कॉपीरायटर राम बोरसे यांनीही विद्यार्थ्यांना लेखन, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि बदलत्या माध्यमविश्वातील संधी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. पर्यवेक्षिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमास शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.







