शेतातील मोटारपंप चोरीचा छडा; रावेर पोलिसांकडून चौघांना अटक चोरीची विद्युत मोटारपंप हस्तगत; आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू

Spread the love

रावेर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): शेतातून चोरी जाणाऱ्या विद्युत मोटारपंप व कॉपर वायरच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेला रावेर पोलिसांना यश आले आहे. शेतातील मोटारपंप चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली विद्युत मोटारपंप हस्तगत करण्यात आली आहे.

 

रावेर पोलीस ठाण्यात मोहन लालचंद कावडकर (रा. रमजीपूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ०४४४/२०२६ दाखल करण्यात आला होता. त्यांच्या गट क्रमांक १६२२/२ मधील शेतातून ३ ऑक्टोबरच्या रात्री ५ एचपी क्षमतेची समुराई कंपनीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.

 

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेतातील मोटारपंप व कॉपर वायर चोरीच्या घटनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, बिट अंमलदार आणि गुन्हे शोध पथकाची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

 

तपासादरम्यान पोलिसांना चोरीची मोटारपंप रमजीपूर येथे विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०), उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३) आणि आनंदा गोपाळ धनगर (वय २८), सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर यांना ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता संशयितांनी मोटारपंप चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या माहितीवरून चोरीस गेलेली विद्युत मोटारपंप हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारे आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का, त्यांचे आणखी साथीदार आहेत का तसेच चोरीचा माल कोणाला विकला आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

 

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

 

रावेर शहर व परिसरात जुनी मोटार, कॉपर वायर, विद्युत पंप आदी वस्तूंची संशयास्पद खरेदी-विक्री होत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी रावेर पोलीस ठाणे किंवा पोलीस निरीक्षकांकडे द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

 

कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमुल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकातील श्रीकांत वव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

या गुन्ह्याचा पुढील तपास बिट अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका! जामखेड, कॅम्प...

अहिल्यानगर (प्रतिनिधी: अमीर शेख): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. जामखेड, कॅम्प आणि कोतवाली...

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना...

जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील मेहरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे...

मुक्ताईनगर पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; १९.१३ लाखांचा मुद्देमाल...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: अमृत सपकाळे):महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका...

संपादक - रजत शेख

Latest