मुक्ताईनगर पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; १९.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: अमृत सपकाळे):महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रतिबंधित पानमसाला, जर्दा तसेच बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांना ६ ऑक्टोबर रोजी बोदवड चौफुली परिसरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी बोदवड चौफुली परिसरात विशेष पथक तैनात करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. HR-84-1073) संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व जर्दा आढळून आला.

असा मुद्देमाल जप्त

प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला – ६,७५० पाकिटे : ₹१०,१२,५००

प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्दा – ६,००० पाकिटे : ₹५,७६,०००

महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. HR-84-1073 : ₹३,२५,०००

एकूण : ₹१९,१३,५००

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९१/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभमसिंग विद्ययाराम (वय २५, रा. निनावा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेला गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे तसेच या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र धनगर आणि पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी यांनी सहभाग घेतला.

पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना...

जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील मेहरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे...

आमोदा येथे तलाठ्याला १ हजारांची लाच घेताना पकडले; एसीबीची...

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख):शेताच्या सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची (बोअरवेल) नोंद घेऊन त्याचा उतारा देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ३ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर...

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझी यशोगाथा’; युवा उद्योजक सचिन घुगे...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन) :विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण व्हावी, कष्ट, जिद्द, सातत्य आणि कौशल्याच्या माध्यमातून यशस्वी होता येते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने सेवा...

संपादक - रजत शेख

Latest