पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई; १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: मसूद सय्यद): जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान इनोव्हा वाहनातून वाहतूक केला जात असलेला केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत वाहनासह एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नाकाबंदीदरम्यान वाहन थांबवून तपासणी

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी आपल्या पथकाला अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

 

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक नाकाबंदी करीत असताना पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (क्रमांक एमएच-१८-एजे-६५२५) पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली.

 

तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याचे नाव आबा विठ्ठल पाटील (वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव, जि. जळगाव) असे निष्पन्न झाले.

 

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ३३ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा, तसेच ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सरकारतर्फे फिर्याद दिली. महाराष्ट्र राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशानुसार प्रतिबंधित असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल शाम हटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले टवेरा वाहन अमरावतीत सापडले; एक आरोपी...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: सतीश चव्हाण):शहरातील अक्सानगर परिसरातून चोरीला गेलेले ट टवेरा वाहन अमरावती शहरातील नवसारी परिसरातून शोधून काढण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी...

जळगाव : फत्तेपुर पोलिसांची कारवाई; शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघांना...

जळगाव (प्रतिनिधी :सरिता महाजन): दि. १२ ऑक्टोबर : जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या तिघांना फत्तेपुर पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस...

अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील दोन अट्टल घरफोड्यांना अटक...

जळगाव(प्रतिनिधी: आसमा शेख) : दि. १२ ऑक्टोबर : अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे....

संपादक - रजत शेख

Latest