जळगाव (प्रतिनिधी : आसमा शेख) :
धरणगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावरून चोरीला गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील एका संशयित आरोपीला भडगाव तालुक्यातील कजगाव येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता आपली काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक MH-19-DL-0268) धरणगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यानंतर ते पंचायत समितीमध्ये कामानिमित्त गेले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आढळली नाही. अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली.
या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला.
या तपासातून मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील हुगाने येथील मनोज केदार बारेला याला भडगाव तालुक्यातील कजगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
पुढील कारवाईसाठी आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात
ताब्यात घेतलेला आरोपी आणि हस्तगत केलेली मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, हरिलाल पाटील, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, राहुल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, गोपाल पाटील तसेच तपासी अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण यांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.








