पाचोरा (प्रतिनिधी: मुकेश कोळी): पाचोरा शहरातील बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एका आंतरराज्यीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली ७७ हजार ५०० रुपयांची संपूर्ण रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी दिनेश निलेश सोनवणे (वय ३०, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पैसे भरण्यासाठी आले होते. बँकेत मोठी गर्दी असल्याने ते मोटारसायकलच्या कामासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील स्वराज्य ऑटो गॅरेज येथे गेले. त्यांनी रोख रक्कम असलेली बॅग गॅरेजमध्ये ठेवली असता, वाहनाच्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बॅगेसह ७७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ तसेच स्टेट बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती फिर्यादीचा बँकेपासून स्वराज्य ऑटो गॅरेजपर्यंत पाठलाग करून रेकी करत असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित व्यक्ती मध्यप्रदेशातील सांसी कडिया, जिल्हा राजगड येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पाचोरा पोलिसांनी ‘ऑपरेशन MP’ सुरू करून १ ऑक्टोबर रोजी तपास पथक मध्यप्रदेशात रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजगड जिल्ह्यातील बोड़ा पोलीस ठाणे हद्दीतील सांसी कडिया गावात ३ ऑक्टोबर रोजी धाड टाकून रितीक राजाराम सिसोदिया (रा. सांसी कडिया, जि. राजगड, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेली ७७ हजार ५०० रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली असून, आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांनी आंतरराज्यीय तपासात प्रभावी कामगिरी बजावत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल परत मिळवला आहे.
कारवाईत सहभागी पोलीस पथक :
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ उमेश देविदास पाटील, पोहेकॉ राहुल काशीनाथ शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल हरीश कनिराम परदेशी आणि पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम अरुण शिंपी यांनी ही कारवाई केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल काशीनाथ शिंपी करीत आहेत.







