जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख) : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्यातर्फे रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जळगाव शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
१) आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक :
आकाशवाणी चौक → न्यायालय चौक → कवयित्री बहिणाबाई उद्यान → रिंगरोड → गोकुळ स्वीट मार्ट → शाहू कॉम्प्लेक्स.
२) न्यायालय चौक ते आकाशवाणी चौक :
न्यायालय चौक → शाहू कॉम्प्लेक्स → गोकुळ स्वीट मार्ट → रिंगरोड → कवयित्री बहिणाबाई उद्यान → आकाशवाणी चौक.
३) नेरी नाका ते स्वतंत्र चौक :
नेरी नाका → पांडे चौक → सिव्हिल हॉस्पिटल → बेंडाळे चौक → चित्रा चौक → न्यायालय चौक.
४) प्रभात चौक ते नेरी नाका/न्यायालय चौक :
प्रभात चौक → कवयित्री बहिणाबाई उद्यान → रिंगरोड → गोकुळ स्वीट मार्ट → शाहू कॉम्प्लेक्स → न्यायालय चौक → चित्रा चौक → बेंडाळे चौक → नेरी नाका.
जळगाव पोलिसांनी नागरिक आणि वाहनचालकांना मोर्चाच्या कालावधीत वरील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर अनावश्यकपणे वाहने आणू नयेत तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.








