जळगाव : (प्रतिनिधी: इमरान खान): अवैध अग्निशस्त्रांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोटारसायकल, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत चिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रांबाबत गोपनीय माहिती संकलित करण्यात येत होती.
दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनावणे यांना काही इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी केली.
यावेळी हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH-18 CA-2228 वरून येणाऱ्या साहील दगडू आवारे (वय १९), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३) आणि रोहित चंद्रकांत जुनुगर (वय ३०), सर्व रा. पिंपरी-चिंचवड, जि. पुणे यांना पोलिसांनी थांबविले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे, हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, दोन अँड्रॉईड मोबाईल फोन आणि १२ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत चिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (चोपडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, विशाल पाटील, प्रकाश मथुरे, गजानन पाटील, शुभम पाटील आणि प्रमोद पवार यांच्या पथकाने सहभाग घेतला.








