मेहरूण (प्रतिनिधी : सरिता महाजन) : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ज्येष्ठांच्या पायाशी संस्कार’ हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या संचालिका स्वर्गीय सुभद्राताई सुरेश नाईक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या उपक्रमातून ज्येष्ठांचा सन्मान, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सत्कार समारंभात पुष्पगुच्छ देण्याची प्रथा असताना विद्यालयाने त्याला पर्यावरणपूरक पर्याय देत पुष्पगुच्छाऐवजी विविध वृक्षांच्या बिया देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला. ‘फुले काही काळ आनंद देतात; मात्र एका बीजातून भविष्यात संपूर्ण वृक्ष उभा राहतो,’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिकांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जीवनातील अनुभव, संघर्ष, कष्ट, नातेसंबंध, संस्कार आणि निसर्गप्रेमाबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच ज्येष्ठांच्या अनुभवातून जीवनमूल्यांचे शिक्षण मिळाले.
आशीर्वादाची शिदोरी अन् हातात पर्यावरणाची बीजे
उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध वृक्षांच्या बिया भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या बियांचे जतन करून योग्य वेळी त्यांची लागवड करण्याचा संकल्प केला. ‘ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बियांची पेरणी—दोन्ही पुढच्या पिढीसाठी अमूल्य ठेव’, असा संदेश यावेळी देण्यात आला.
स्वर्गीय सुभद्राताई सुरेश नाईक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेत ज्येष्ठांचा आदर करणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे आणि निसर्ग संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘ज्येष्ठांचा सन्मान करू, त्यांचे अनुभव ऐकू, त्यांच्याकडून संस्कार घेऊ आणि प्रत्येक बीजाचे वृक्षात रूपांतर करू’ अशी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी ज्येष्ठांचे अनुभव ही समाजाची मौल्यवान संपत्ती असून विद्यार्थ्यांनी त्यातून जीवनमूल्ये आत्मसात करावीत, असे सांगितले.
ज्येष्ठांचा सन्मान, तीन पिढ्यांमधील संवाद आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. ‘पुष्पगुच्छ कोमेजतो; पण बीज रुजते, वाढते आणि पुढच्या पिढ्यांना सावली देते!’ हा संदेश देत संत ज्ञानेश्वर विद्यालयाने ज्येष्ठ नागरिक दिनाला आगळेवेगळे पर्यावरणपूरक स्वरूप दिले.







