भुसावळ(प्रतिनिधी: सतीश दहीकर) : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता महिला बाजार करून घरी पायी जात होत्या. दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळ रिक्षा त्यांच्याजवळ आली. रिक्षाचालकाने ‘तुम्हाला घरी सोडतो’ असे सांगितल्याने महिला रिक्षाच्या मागील बाजूस बसल्या. त्यावेळी रिक्षेतील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ संशयितांचा शोध घेतला असता तीन जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे वसीम शेरअली तेली (वय ३८, रा. फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (वय २६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (वय ३६, रा. साती मजार, नशिराबाद) अशी आहेत.
१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र, किंमत २५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा (क्र. एमएच-१९-४-६५६३), किंमत १ लाख रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींचा पूर्वगुन्हेगारी तपशील
पोलिसांच्या माहितीनुसार, वसीम शेरअली तेली याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६१८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२), रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३३९/२०२०, भा.दं.वि. कलम ३४, ३९२ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४५/२०२०, भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत.
तर वसीम अजमल खान याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६१८/२०२५, भा.न्या.सं. २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांनी सहभाग घेतला.







