जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन):मेहरूण येथील रोजी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सवयी, वर्तन, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी आणि सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘माझ्या पाल्याची प्रगती, माझी जबाबदारी’ हा पालक-शिक्षक संवाद उपक्रम उत्साहात पार पडला.
महिन्याच्या अखेरच्या दिवशी पालकांना शाळेत आमंत्रित करून शिक्षकांनी त्यांच्या पाल्याच्या महिनाभरातील प्रगतीबाबत प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, गृहपाठ, वाचन-लेखन, गणितीय कौशल्ये, शिस्त, वर्तन तसेच विविध शालेय उपक्रमांतील सहभाग याबाबत पालकांना माहिती देण्यात आली.
पालकांकडूनही विद्यार्थ्यांच्या घरी होणाऱ्या अभ्यासाबाबत माहिती घेण्यात आली. अभ्यासातील अडचणी, मोबाईलचा वापर, वाचनाची सवय, घरी अभ्यासासाठी दिला जाणारा वेळ तसेच शाळेकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचा एक चांगला गुण, सुधारणा आवश्यक असलेली एक बाब आणि पुढील महिन्याचे एक उद्दिष्ट निश्चित केले. तसेच पालक म्हणून विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी पुढील महिन्यात कोणती जबाबदारी स्वीकारणार, याबाबत संकल्प करण्यात आला.
या उपक्रमामुळे पालकसभा केवळ सूचना देण्यापुरती मर्यादित न राहता पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सातत्यपूर्ण संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरली. विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत ओळखून त्यावर शाळा व पालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे, यावर विशेष भर देण्यात आला.
“माझ्या पाल्याची प्रगती ही केवळ शाळेची नव्हे, तर पालकांचीही जबाबदारी आहे,” या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाने उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले.







