अक्कलकोट (प्रतिनिधी: मोसिन शेख) : अंमली पदार्थांविरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील ऊसाच्या शेतात छापा टाकून तब्बल २११ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलिसांचे पथक करजगी दूरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आळगी येथील एका ऊसाच्या शेतात गांजासदृश्य वनस्पतींची लागवड केल्याची माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तत्काळ ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संबंधित शेतात दाखल झाले.
ऊसाच्या शेतात आढळली १२ फूट उंचीची झाडे
शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अंदाजे १२ फूट उंचीची गांजासदृश्य झाडे आढळून आली. पंचनामा करून पोलिसांनी झाडे जप्त केली.
कारवाईदरम्यान एकूण २४० गांजाची झाडे आढळली. त्यापैकी २१० झाडे जिवंत, तर ३० झाडे वाळलेली होती. जप्त गांजाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त केलेला गांजा कुठे विक्रीसाठी पाठविण्यात येणार होता, यासह विविध बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.







