जळगाव(प्रतिनिधी ) :जिल्ह्यात शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटर, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी भंगार दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान भोकरी आणि कु-हाड परिसरातील चार भंगार दुकानांतून एकूण ७५ हजार ४०० रुपये किमतीची कॉपर व अॅल्युमिनियमची तार आढळून आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ सप्टेंबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने वरखेडी, भोकरी तसेच लोहारा दुरक्षेत्रातील कु-हाड गावातील भंगार दुकानांची तपासणी केली.
भोकरी येथील कलीम नवी काकर यांच्या दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो कॉपरची तार, हकीम आब्वाज काकर यांच्या दुकानातून १० हजार रुपये किमतीची १० किलो कॉपरची तार आणि राजू उस्मान काकर यांच्या दुकानातून १ हजार ४०० रुपये किमतीची १४ किलो अॅल्युमिनियमची तार आढळून आली. तसेच कु-हाड येथील अब्युजर हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो कॉपरची तार जप्त करण्यात आली.
सदर साहित्याबाबत भंगार दुकानदारांकडे आवश्यक कागदपत्रे तसेच खरेदी-विक्रीचे पुरावे मागण्यात आले. मात्र समाधानकारक माहिती व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित चार जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जप्त केलेल्या तारसाठ्याचा चोरीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधितांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार, अभिजीत निकम, पोलीस नाईक दीपक अहिरे, तसेच पोलीस कर्मचारी प्रविण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज वडगुजर आणि नामदेव इंगळे सहभागी झाले.







