मेहरूण (प्रतिनिधी): नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, तसेच प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार, नागरिकांचा माहिती मिळविण्याचा हक्क तसेच सार्वजनिक प्रशासनातील पारदर्शकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “माहिती हा अधिकार, लोकशाहीचा आधार!” या घोषवाक्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासन व सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदेशीर अधिकार आहे. या अधिकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होते. नागरिकांनी आपल्या अधिकारांची माहिती करून घेऊन त्याचा योग्य व जबाबदारीने वापर करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून माहिती अधिकाराबाबत जनजागृती केली. माहिती जाणून घेणे, आपल्या अधिकारांची ओळख करून घेणे आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान देणे यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षिका शितल कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.








