जळगाव(प्रतिनिधी): ३० सप्टेंबर २०२६
धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळून चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे फोर्स कंपनीचे क्रूझर वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
दिनांक २९ सप्टेंबर रोजी फिर्यादीने धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रावसाहेब नगराज देवरें यांच्या नावावर असलेले सिल्वर रंगाचे फोर्स कंपनीचे क्रूझर वाहन क्रमांक MH-41-4-4140 हे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने वाहन चोरून नेले.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रुपेश अशोक मराठे (वय २५, रा. आडगाव, ता. यावल, जि. जळगाव) याला अडावद-धानोरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले ७.५० लाख रुपये किमतीचे फोर्स क्रूझर वाहन हस्तगत करण्यात आले.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. जितेंद्र चव्हाण करीत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. उमाकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. विष्णू बिन्हाडे, पोहेकॉ. दीपक माळी, पोहेकॉ. रवींद्र पाटील, पोहेकॉ. जितेंद्र चव्हाण, पोहेकॉ. समाधान भागवत, पोहेकॉ. जयदीप राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल किशोर भोई आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.








