मेहरूण(प्रतिनिधी ): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे सोमवारी सखी सावित्री समितीच्या पुढाकारातून भुलाबाईची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी भुलाबाईला ११ डझन केळींचा भोग अर्पण करण्यात आला. या उपक्रमाने शाळेत भुलाबाई महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.

भुलाबाई महोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक भुलाबाईची गाणी, विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अन्य मनोरंजनात्मक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची जवळून ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भुलाबाईची परंपरा ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, संस्कार, आनंद आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक लोककला व सण-उत्सवांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच ‘परंपरा जपूया, संस्कृती पुढे नेऊया’ हा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी तसेच सखी सावित्री समितीच्या सदस्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनीही भुलाबाई महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.








