पनवेल( प्रतिनिधी) :२४ सप्टेंबर २०२६ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल हद्दीतील किलोमीटर क्रमांक १६ जवळ गुरुवारी सकाळी सुमारे ७:४५ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
बस प्रवासादरम्यान तिच्यातून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
प्रवासी खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच बसने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने वेळीच परिस्थिती ओळखून बस थांबवल्याने तसेच प्रवाशांनी तातडीने बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.








