चाळीसगाव (प्रतिनिधी) : २२ सप्टेंबर २०२६
मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा शिवारात गिरणा नदीकाठालगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे ६०० लिटर गुळ-नवसागर मिश्रित फसफसते कच्चे व पक्के रसायन, तसेच १०० लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
परिसराच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिर्ले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जामदा शिवारातील गिरणा नदीकाठच्या गावठाण जागेत काटेरी झुडपांच्या आडोशाला गावठी हातभट्टी लावून दारू तयार केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान सागर धर्मा गोकुळ (रा. जामदा, ता. चाळीसगाव) यास ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी मिळून आलेले सुमारे ६०० लिटर कच्चे व पक्के रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले.
ही कारवाई प्रभारी पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, पोहेकॉ/२४०९ विश्वास देशमुख, पोहेकॉ/३१०३ प्रकाश कोळी, पोना/९०८ योगेश पाटील, पोकॉ/३३५६ विनोद बेलदार आणि पोकॉ/१००९ दिपक महाजन यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी पोकॉ/१००९ दिपक महाजन यांच्या फिर्यादीवरून सागर धर्मा गोकुळ याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.








