मेहरूण( प्रतिनिधी : सरिता महाजन) :

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सीड बँक उपक्रमातील तब्बल ५१ हजार बिया शाळेचे संस्थाचालक व अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी प्रेमपूर्वक दिलेल्या या पर्यावरणपूरक भेटीचे श्री गणरायाला भोग अर्पण करून नाईक यांनी या बियांच्या माध्यमातून भविष्यात जंगलनिर्मिती करण्याचा संकल्प केला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांहून विविध प्रकारच्या बिया संकलित करून त्यांचे जतन केले आहे. या बियांमध्ये भविष्यातील हिरवाईचे बीज दडले असून, त्यांचे रोपांमध्ये आणि पुढे वृक्षांमध्ये रूपांतर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेने ‘मोदक नको, झाडे हवीत!’ हा पर्यावरणपूरक संदेश देत उत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड दिली. पारंपरिक मिठाई किंवा भेटवस्तूंऐवजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ५१ हजार बियांची भेट पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरली.
‘बीज ते वृक्ष आणि वृक्ष ते जंगल’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच कृतीशील पर्यावरण संस्कार रुजविण्याचे काम इको क्लबच्या माध्यमातून सुरू आहे. या उपक्रमाला संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या ५१ हजार बियांचे श्री गणरायाला भोग अर्पण करून त्याच बियांच्या माध्यमातून भविष्यात जंगल उभे करण्याचा संकल्प करण्यात आल्याने वाढदिवसाचा सोहळा पर्यावरण संवर्धनाच्या अभिनव उपक्रमात रूपांतरित झाला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पुढील काळातही बळ मिळावे, तसेच या ५१ हजार बियांचे भविष्यात हिरवाईने नटलेल्या वृक्षांमध्ये रूपांतर व्हावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.








