जळगाव (प्रतिनिधी) : २१ सप्टेंबर २०२६
शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करून देण्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले.
ACBच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जामनेर शिवारातील शेताचा गट क्रमांक ४०७ असून, शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी सन २०२२ मध्ये तहसील कार्यालय, जामनेर येथे वहिवाटीचा दावा दाखल करण्यात आला होता. सदर दावा अंतिम निकालासाठी प्रलंबित होता.
या प्रकरणात तक्रारदाराने वेळोवेळी महसूल सहाय्यक प्रविण सुपडु गांगुर्डे (वय ४१) यांची भेट घेतली. तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रथम ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तडजोड होऊन २५ हजार रुपये देण्याचे ठरल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली.
तक्रारीची २१ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी खासगी इसम योगेश रामलाल वखरे (वय ४२) याने गांगुर्डे यांच्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे ACBच्या कारवाईत निष्पन्न झाले.
यानंतर तहसील कार्यालय, जामनेर येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर योगेश वखरे याने ती रक्कम प्रविण गांगुर्डे यांच्याकडे दिली. गांगुर्डे यांनी लाचेची रक्कम स्वीकारून ती पॅन्टच्या पुढील बाजूच्या उजव्या खिशात ठेवली. ACBच्या पथकाने लाचेची रक्कम जप्त केली.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही संशयित आरोपींना ACBने ताब्यात घेतले आहे.
कारवाईतील अधिकारी
सापळा अधिकारी म्हणून श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार, कॅम्प जळगाव यांनी कारवाई केली.
पर्यवेक्षणाची जबाबदारी श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ACB जळगाव यांनी पार पाडली.
सापळा पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील (चालक), पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांचा सहभाग होता.
या कारवाईस मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र, मा. श्री. प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र तसेच मा. श्रीमती कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.








