जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान) १७ सप्टेंबर २०२६

रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक वस्तूंची वेळेत ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गुरुवारी (१७ सप्टेंबर) इच्छादेवी पोलीस चौकी येथे वाहनचालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनचालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

उद्योजक तथा जिनिंग मिलचे मालक श्री. अनिल मंडेरा यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाहनचालकांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी जाणून घेण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थिती तसेच कोविड काळात नागरिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे आणि औषधोपचारासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात वाहनचालकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहन चालविताना मद्यपान करून वाहन न चालविणे, वाहन चालविताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स, विमा तसेच आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे, वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास इच्छादेवी पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील वाहनचालक उपस्थित होते. चालक दिनाच्या निमित्ताने वाहनचालकांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान केल्याने उपस्थित चालकांनी समाधान व्यक्त केले.








