मेहरूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘सीड लायब्ररी’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गणरायाच्या आगमनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये बीजसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शाळेत ‘बीज दानपेटी’ ठेवण्यात आली असून, पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या घरातील विविध झाडांच्या बिया शाळेत दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा, जांभूळ, चिंच, सीताफळ, बेल, वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, आपटा यांसह विविध स्थानिक वृक्षांच्या बियांचे संकलन केले जाणार आहे. संकलित बियांची विद्यार्थ्यांकडून वर्गवारी, नोंदणी, जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.
या बियांपासून पुढील काळात रोपे तयार करून त्यांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘बीज ते वृक्ष’ हा संपूर्ण प्रवास प्रत्यक्ष अनुभवता येणार असून, त्यातून निसर्गाशी त्यांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून “गणरायाला एक बीज अर्पण, भविष्यासाठी एक वृक्ष संकल्प” हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे.
“एक बीज दान करा… उद्याचे एक झाड घडवा!” या आवाहनाला प्रतिसाद देत पालकांनी आपल्या घरातील उपलब्ध बिया शाळेच्या बीज दानपेटीत जमा करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणीय जबाबदारी, जैवविविधता संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजण्यास हातभार लागणार आहे.
— श्री. मुकेश सुरेश नाईक
मुख्याध्यापक, श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण








