जळगाव (प्रतिनिधी ): १५ सप्टेंबर २०२६
कासोदा शिवारातील शेताच्या पत्री शेडमधून चोरीस गेलेल्या तब्बल २३ शेळ्या-बोकडांच्या चोरीचा गुन्हा कासोदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात धडक कारवाई करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त केले आहे.
दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून १८ शेळ्या आणि ५ बोकड, असे एकूण २३ शेळ्या-बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी दि. ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
पथकाने तांत्रिक तपासणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात जाऊन कारवाई केली. यावेळी अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही आरोपींनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींची अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यांचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचा शोध घेण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण गाडीलोहार आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. कासोदा पोलिसांच्या या कारवाईमुळे शेळ्या-बोकड चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, पुढील तपास सुरू आहे.








