मेहरूण (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने यंदा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणरायाला दररोज वेगवेगळ्या नैसर्गिक व पुनर्वापरित साहित्यापासून तयार केलेला हार अर्पण करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी बिया, धान्य, कडधान्ये, कागद, नारळाची साल, वाळलेली पाने, फळांच्या बिया, शाडू माती, ज्यूट आणि कापूस अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे विविध प्रकारचे हार तयार केले जाणार असून, प्रत्येक हारामागे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.
‘बीज अर्पण – हरित विसर्जन’चा संदेश
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘बीज अर्पण – हरित विसर्जन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या दिवशी बियांचा हार गणरायाला अर्पण करून त्यातील बिया शाळेच्या Seed Bank मध्ये जतन केल्या जाणार आहेत. त्यानंतर योग्य वेळी या बियांचे रोपण करून वृक्षसंवर्धनाला चालना देण्यात येणार आहे.
‘गणरायाच्या चरणी फुले नव्हे, हरित भविष्यासाठी बीज अर्पण करूया’ या संदेशातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर, निसर्गप्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे.
मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांचाही सहभाग राहणार आहे. गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उपक्रमाची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि निसर्गप्रेमाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार आहे.








