जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पानांपासून गणपती साकारण्याचा अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध आकारांची पाने निवडून त्यांची कलात्मक मांडणी करत आपल्या कल्पकतेतून गणरायाची प्रतिमा साकारली. पानांचा आकार, रंग आणि पोत यांचा विचार करताना विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, हात-डोळा समन्वय, सर्जनशीलता आणि हस्तकौशल्याला चालना मिळाली.
तयार झालेल्या गणरायाकडे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद विशेष लक्षवेधी ठरला. ‘आपण स्वतःच्या हाताने गणपती तयार केला’ या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला. नैसर्गिक साधनांचा वापर करून गणराय साकारल्याने विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश कृतीतून अनुभवता आला.
आनंददायी शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न देता कृती, खेळ आणि सर्जनशील उपक्रमातून शिकण्याची संधी देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून कला, आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधण्यात आला.
मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका करिष्मा चव्हाण, गायत्री चौधरी व अनिता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेला सुंदर अभिव्यक्ती दिली.
“शिकूया आनंदाने, घडवूया सर्जनशीलतेने आणि जपूया निसर्गाला!” या संदेशातून चिमुकल्यांनी साकारलेला पानांचा गणराय शाळेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.








