जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर पूजनाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

पूर्वी पोळा सणाला शेतकऱ्याच्या शेतीतील महत्त्वाचा साथीदार असलेल्या बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढले असून, बैलांसोबतच ट्रॅक्टरनेही शेतीच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच बदलत्या शेती संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी विद्यालयात ट्रॅक्टरची आकर्षक सजावट करून विधिवत पूजन व औक्षण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना पारंपरिक पोळा आणि आधुनिक पोळा यातील बदलांची माहिती देण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा पारंपरिक साथीदार, तर ट्रॅक्टर हा आधुनिक शेतीचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगण्यात आले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी शेतकरी, शेती आणि निसर्ग यांच्यातील नाते कायम आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
ट्रॅक्टरला फुलांची सजावट करून त्याचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत शेतकरी आणि शेतीच्या साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “साधने बदलली, शेतीची पद्धत बदलली; मात्र शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतीशी असलेला जिव्हाळा कायम आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.








