जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अपहरण व खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तब्बल ४० दिवसांच्या अथक तपासानंतर छडा लावला आहे. या प्रकरणात महिलेचा सख्खा भाचा प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या जबाबावरून जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळून महिलेचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, करंजी बु. येथे एकट्या राहणाऱ्या गं.भा. वैजंताबाई गणपत माळी या ३ ऑगस्ट रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे चुलत पुतणे भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांच्या खबरीवरून ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली होती. महिलेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त होत होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली. एका पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकाने बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास केला.
१५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१६ वाजता प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना दिसून आला. त्यानंतर वैजंताबाई एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून पारोळ्याच्या दिशेने जाताना दिसल्याचे पोलिसांनी सांगितले.
तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमधील विसंगतींमुळे प्रशांत माळी याच्यावर संशय बळावला. ४० दिवसांच्या शोधानंतर LCB पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रशांतने अखेर गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
नातेवाईकाच्या मृत्यूचे खोटे कारण सांगून कारमध्ये नेले
पोलिसांच्या तपासानुसार, प्रशांतवर मोठे कर्ज होते. त्याने यापूर्वी वैजंताबाई यांच्याकडून पैसे घेतले होते. मात्र त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिल्याने आणि त्यांच्या अंगावरील दागिन्यांवर त्याचा डोळा असल्याने त्याने कट रचल्याचे तपासात समोर आले.
३ ऑगस्ट रोजी शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून तेथे जायचे असल्याचे खोटे सांगून त्याने वैजंताबाई यांना भाड्याच्या कारमधून सोबत नेले. दिवसभर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात फिरवत त्याने दागिने मागितले. मात्र वैजंताबाईंनी दागिने देण्यास विरोध केला.
धुळे येथे खून; कानळदा फाट्याजवळ मृतदेह टाकला
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर कार थांबवून प्रशांतने रुमालाने गळा आवळून वैजंताबाईंचा खून केला. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळ सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले.
आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध घेऊन वैजंताबाई यांचा मृतदेह हस्तगत केला. आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याची माहिती दिली असून, उर्वरित दागिने फागणे (धुळे) परिसरात लपविल्याचे सांगितले आहे. चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
पारोळा पोलिसांकडून पुढील तपास
भैय्यासाहेब रोकडे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२०२६ अन्वये BNS कलम १३७ (२) आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खून आणि पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील संबंधित कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार यांच्यासह पोलीस हवालदार हिरालाल पाटील, विलेश सोनवणे, सलीम तडीव, राहुल वैसाने, पोलीस कॉन्स्टेबल विलास गायकवाड, राहुल कोळी, गोपाळ पाटील, मयुर निकम, चालक पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील, महेश सोमवंशी, रिझवान शेख यांचा सहभाग होता.
तांत्रिक विश्लेषणाचे काम पोलीस हवालदार मिलिंद जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील यांनी पाहिले. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे, पोलीस हवालदार सुनील हटकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड, सतीश पाटील, चेरसिंग मेहेर यांनी तपासात सहभाग घेतला.








