माता-पालकांचा ‘एक तास’ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; माता-पालक मेळाव्यात घेतला संकल्प

Spread the love

मेहरुण(प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी द्वितीय माता-पालक शैक्षणिक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी तसेच सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत यावेळी माता-पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने ‘माता-पालकांचा एक तास’ हा विशेष संकल्प मेळाव्यात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, वाचनासाठी, गृहपाठाच्या नियोजनासाठी तसेच त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माता-पालकांनी आपल्या पाल्यासाठी नियमितपणे किमान एक तास वेळ द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

 

या एका तासातून मुलांशी संवाद साधणे, त्यांचे वाचन ऐकणे, अभ्यासाची उजळणी घेणे तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे यावर विशेष भर देण्यात आला. ‘पालकांचा एक तास म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी दिलेला मौल्यवान वेळ’ या भावनेतून शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 

मुलांच्या अभ्यासातील अडचणी केवळ गुणांच्या माध्यमातून न पाहता त्यामागील कारणे समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन व आवश्यक मार्गदर्शन देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

कला शिक्षणावर विशेष भर

 

मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या कला शिक्षणावरही विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढावा, यासाठी चित्रकला, रेखाचित्र, रंगकाम, हस्तकला, कागदकाम, टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती निर्मिती, संगीत, नृत्य व अभिनय अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

 

‘प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो’, त्यामुळे मुलांच्या कलाकृतींमध्ये चुका शोधण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नांचे व कल्पकतेचे कौतुक करावे आणि घरच्या घरी मुलांना सर्जनशील उपक्रमांसाठी वेळ द्यावा, असे मार्गदर्शन माता-पालकांना करण्यात आले.

 

रेमेडियल क्लासेसवर भर

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना वाचन, लेखन, गणितीय कौशल्ये तसेच विविध विषयांमध्ये अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन अर्थात रेमेडियल क्लासेस राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अतिरिक्त सराव, पुनरावृत्ती आणि वैयक्तिक मार्गदर्शन देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगतीची संधी मिळाली पाहिजे’ या उद्देशाने शाळेच्या वतीने उपचारात्मक वर्ग प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

 

पर्यावरणपूरक उपक्रमांना पालकांचे सहकार्य

 

शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमध्येही माता-पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बीज बँक, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांची माहिती देऊन पालकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

 

यावेळी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, घरी वाचनाची सवय, मोबाईलचा योग्य वापर, गृहपाठाकडे लक्ष, वेळेचे नियोजन तसेच मुलांच्या भावनिक गरजा याबाबतही माता-पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पालकांच्या सूचना व अडचणी जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.

 

या मेळाव्यास पर्यवेक्षिका शितल कोळी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शाळा आणि पालक यांच्यातील समन्वयातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या कला, कौशल्ये, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. माता-पालकांचा नियमित ‘एक तास’ आणि शाळेचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी वाटचाल करण्याचा संदेश या माता-पालक शैक्षणिक मेळाव्यातून देण्यात आला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest