‘कामाला लिंग नसते’; दप्तरमुक्त शनिवारी मुलांनी-मुलींनी अनुभवली घरकामाची शाळा

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन घरकामांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सहकार्य आणि जीवनकौशल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध कृती केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. कपड्यांची घडी करणे, भाजी निवडणे, तांदूळ व डाळ निवडणे, लसूण सोलणे, झाडू मारणे, घर पुसणे, भांडी स्वच्छ करणे, स्वयंपाक करणे तसेच चहा तयार करणे अशा विविध दैनंदिन कामांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विशेष म्हणजे, ‘हे मुलांचे काम आणि हे मुलींचे काम’ असा कोणताही भेद न करता सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक कृतीत सहभागी करून घेण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वयंपाकाचा अनुभव घेतला, तर मुलांनी चहा तयार करणे, स्वच्छता करणे आणि इतर घरकामांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे ‘घरकाम ही केवळ महिलांची जबाबदारी नसून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची समान जबाबदारी आहे’ हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.

‘कामाला लिंग नसते; प्रत्येक कामाला प्रतिष्ठा असते’ हा विचार या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला. घरातील छोटी-मोठी कामे करण्यास लाज न बाळगता स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय, इतरांना मदत करण्याची भावना आणि प्रत्येक श्रमाचा आदर करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

पुस्तके आणि वह्या बाजूला ठेवून प्रत्यक्ष अनुभवातून शिकताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विविध कृती करताना विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत केली तसेच प्रत्येक कामाचे महत्त्व आणि त्यामागील श्रम समजून घेतले. अनुभवाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनासोबतच सामाजिक जाणीवा आणि समानतेची मूल्ये अधिक दृढ होण्यास मदत झाली.

 

दप्तरमुक्त शनिवाराच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक ज्ञान न देता विद्यार्थ्यांना ‘जीवन जगण्याचे शिक्षण’ देण्याचा हा उपक्रम शाळेच्या उपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध कृतींचे मार्गदर्शन केले. स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचे संस्कार बालवयातच रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा दप्तरमुक्त शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest