वृक्षारोपणापासून वृक्षसंवर्धनापर्यंत… श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची ‘वृक्ष बँक’ ठरणार हरित क्रांतीचे नवे मॉडेल!

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी): पर्यावरण संरक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासह समाजात वृक्षसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘वृक्ष बँक’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपणापेक्षा वृक्षांचे संगोपन अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात हरित क्रांतीचे नवे मॉडेल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

या उपक्रमांतर्गत नागरिक, पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी यांच्या सहकार्याने विविध प्रकारची रोपे शाळेच्या ‘वृक्ष बँकेत’ जमा केली जाणार आहेत. वृक्षारोपण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच नागरिकांना या वृक्ष बँकेतून मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, रोप स्वीकारताना संबंधित व्यक्तीकडून वृक्ष संगोपनाचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. तसेच त्या वृक्षाच्या वाढीचा नियमित पाठपुरावा शाळेमार्फत करण्यात येणार असून, केवळ रोपांचे वाटप न करता त्यांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. “आज लावलेले एक रोप उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि समृद्ध पर्यावरण देईल. त्यामुळे वृक्ष लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाची शपथ दिली. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

‘रोपापासून वृक्षापर्यंत’ जबाबदारी स्वीकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग वाढविणारा आणि इतर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रेरणादायी आदर्श ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest