जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान)
जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शामनगर परिसरात राहणारे किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कुलूप-कोंडा तोडलेला दिसून आला. घरात तपासणी केली असता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याच्यासह अन्य दोन जणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना संशयित हग्गुसिंग हा जळगाव रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजीतसिंग भोंड (दोघेही रा. आत्महत्या कॉलनी, जळगाव) यांच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात ५ ग्रॅम व १ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुली, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा गोफ, चांदीचे ब्रेसलेट, चांदीच्या तोरड्या, चांदीचे देव, कडे, फुलपात्र तसेच सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, मनोज मराठे, सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी आणि मोतीलाल चौधरी यांनी सहभाग घेतला.
रामानंदनगर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, फरार असलेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.







