मेहुणबारे (प्रतिनिधी : मसूद सय्यद) : १९ सप्टेंबर २०२६
लांबे (ता. चाळीसगाव) येथील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी चोरणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पुरुष व दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तीन मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लांबे गावातील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत १८ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिले यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
दरम्यान, संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाहनाचा क्रमांक एमएच-१६ असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी जामधा फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित कार चाळीसगावकडून जामधाच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पळवून नेली.
पोलिसांनी शासकीय वाहन व खासगी मोटारसायकलींच्या मदतीने कारचा पाठलाग केला. रहिपुरी गावाबाहेर बोरखेड्याकडे जाणाऱ्या वळणावर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील तीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत पोलिसांनी सतीष तुकाराम चव्हाण (२१), ओम तुकाराम चव्हाण (१९) आणि कुणाल सरनेरसिंग चव्हाण (१९), तिघेही रा. सुंदरनगर, करळा रोड, वर्धा यांना अटक केली. पुढील तपासात त्यांच्या महिला साथीदारांचा शोध घेण्यात आला. यावेळी मोनिका तुकाराम चव्हाण (२३), रा. सुंदरनगर, वर्धा आणि सुभाना राकेश भोसले (१९), रा. जळगाव, आर्वी, अमरावती यांना तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून २४.२६ ग्रॅम वजनाचे १७ नग मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या व २४ नग सोन्याचे मणी, तीन मोबाईल फोन आणि एमएच-१६-एटी-६६८४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार जप्त केली आहे.
चौकशीत आरोपींनी चाळीसगाव, नांदगाव बसस्थानक तसेच नाशिक शहरातील सीबीएस बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व मणी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचीही पडताळणी सुरू असून, टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, चाळीसगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ शांताराम पवार, पोहेकॉ देविदास पाटील, पोहेकॉ मनोज पाटील, पोहेकॉ प्रकाश कोळी, पोहेकॉ प्रविण पाटील, पोहेकॉ राजेंद्र जाधव, पोहेकॉ मुकेश देशमुख, पोको विनोद बेलदार आणि पोको कमलेश महाजन यांच्या पथकाने सहभाग घेतला.








