जळगाव(प्रतिनिधी ):दि. २० मे २०२६ — शहरातील चौक व रस्ते सुशोभीकरणाच्या कामांमध्ये महानगरपालिका प्रशासनाने व्यावसायिक कंपन्यांशी संगनमत करून मनपाचे आर्थिक नुकसान केल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी केला आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली लावण्यात आलेले ‘अदाणी’ कंपनीचे नाव तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
लाडवंजारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पंडित नेहरू पुतळा ते रेल्वे स्टेशन तसेच गोविंदा रिक्षा स्टॉप ते नटराज सिनेमा परिसरातील रस्ते विभाजक व चौक सुशोभीकरणाचे काम गेल्या २० वर्षांपासून ओरिएंट कंपनी (अदाणी सिमेंट) यांच्याकडे देण्यात आले आहे. करारानुसार कंपनीला केवळ सुशोभीकरण व जाहिरात फलक लावण्याची परवानगी असताना, कंपनीने मनमानी पद्धतीने सर्कल तोडून लहान केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“मनपाने हे रस्ते कंपनीला आंदण दिल्यासारखी आणि कंपनीने ते विकत घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा संताप व्यक्त करत लाडवंजारी म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळा उभारणीत कंपनीचे कोणतेही योगदान नसताना पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली कंपनीच्या नावाचा ग्रॅनाइट फलक लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुतळ्याचे विद्रुपीकरण झाले आहे.”
महानगरपालिकेने संबंधित फलक तात्काळ हटवावा, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना सुनील भैय्या माळी, राजुभाऊ मोरे, किरणभाऊ राजपूत, मजहरभाई पठाण, रिंकू चौधरी, सुहास चौधरी, भल्ला तडवी आणि रहीम तडवी आदी उपस्थित होते.








