जळगाव (प्रतिनिधी) ; शहरातील वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसत असून समतानगर परिसरातील एका ६० वर्षीय वृद्धाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुदाम बन्सी राठोड (वय ६०, रा. समतानगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सिंधी कॉलनी परिसरात एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वृद्धाची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








