मुंबई (प्रतिनिधी):२२ जुलै – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देणारी महायुती सरकारची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी आज (२२ जुलै) जाहीर केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागाने योजनेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आयकर विभागाकडील आवश्यक माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील काही जाचक अटी रद्द केल्यामुळे आणखी ३६ लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत आले आहेत.
याशिवाय, २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील ५० हजार रुपयांची मर्यादा वाढवून २ लाख रुपये करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी नवीन कर्ज घेण्याची अटही रद्द करण्यात आली असून, या निर्णयाचा लाभ सुमारे २३ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित शेतकरी आपली नावे अधिकृत माध्यमांद्वारे तपासू शकणार आहेत.








