जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक कारवाई; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीच्या जाळ्यावर मोठा प्रहार

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी):

फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे संयुक्तपणे राबविलेली अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ मोहीम यशस्वी ठरली. या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले असून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १०३/२०१६, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. २२/२०२५ तसेच नाशिक ग्रामीणच्या पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १७५/२०२६ मधील फरार व संशयित आरोपींच्या शोधासाठी २१ जुलै रोजी मध्यरात्री पोलीस पथके मध्यप्रदेशात रवाना झाली. पहाटे १ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी परिसरात व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलीस दलातील विविध वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस निरीक्षकांसह सुमारे ४०० अधिकारी-कर्मचारी आणि २० शासकीय वाहनांचा ताफा या कारवाईत सहभागी झाला.

कारवाईदरम्यान ४५ संशयित घरांची झडती, २० व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली, तर १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन देशी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

याशिवाय ३२ संशयित महाराष्ट्र पासिंग मोटारसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले असून पुढील तपासासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

 

जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी समन्वयातून राबविण्यात आलेल्या या अंतरराज्यीय कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, “जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे, संघटित गुन्हेगारी आणि फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलीस कटिबद्ध असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.”


Spread the love

या बातम्या देखील वाचा

चालक सीटवर प्रवासी बसवणाऱ्या ३९ ऑटोरिक्षांवर कारवाई; सव्वा लाखांहून...

लातूर ( प्रतिनिधी):   लातूर शहरात चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त विशेष मोहीम...

चिकूच्या आमिषाने बागेत नेले; १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकू खाण्याचे आमिष दाखवून मुलीला चिकूच्या...

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या...

संपादक - रजत शेख

Latest