जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुणच्या इको क्लबतर्फे ‘वंदे मातरम्’ला पानांच्या माध्यमातून अनोखा सलाम देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.


‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक वारशाला निसर्गाशी जोडत विद्यार्थ्यांनी नैसर्गिकरित्या गळून पडलेली पाने संकलित करण्याची संकल्पना मांडली आहे. या पानांवर राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि देशभक्तीपर संदेश लिहून त्यांची कलात्मक मांडणी करण्यात येणार आहे. संकलित पानांपासून ‘वंदे मातरम्’ची आकर्षक प्रतिकृती तसेच भारताच्या नकाशाची कलात्मक रचना साकारण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हृदयाच्या आकाराच्या पानाचा विशेष वापर. ‘हृदयात मातृभूमी, पानातून वंदे मातरम्!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मातृभूमीवरील प्रेमासोबतच निसर्गाविषयी जिव्हाळा जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
इको क्लबतर्फे ‘१५० पाने – १५० संकल्प’ ही संकल्पनाही राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, पाणी बचत, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी याबाबत प्रत्येकी एक संकल्प घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी झाडांवरून पाने तोडण्याऐवजी केवळ नैसर्गिकरित्या गळून पडलेली पानेच वापरण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “वंदे मातरम् हा केवळ घोष नसून मातृभूमीप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम आणि जबाबदारीची भावना आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”
‘पान पान बोले — वंदे मातरम्!’ या घोषवाक्यासह राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देतानाच राष्ट्रप्रेम, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरणार आहे.
इको क्लबच्या या अभिनव उपक्रमातून ‘निसर्ग जपूया, मातृभूमी सजवूया आणि वंदे मातरम् मनामनात रुजवूया’ असा प्रेरणादायी संदेश देण्यात येत आहे.








