यावल(प्रतिनिधी ):(जि. जळगाव) : यावल पोलीस स्टेशन हद्दीतील गोवंश कत्तल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 112 अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून आरोपींविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना 8 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यावल शहरातील डांगपुरा परिसरातील मन्यारवाडा येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान सैय्यद रशीद निसार कुरेशी (45), सैय्यद आसीफ सैय्यद निसार (33), सैय्यद हफीज सैय्यद निसार कुरेशी (35) आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार (50, सर्व रा. डांगपुरा, मन्यारवाडा, यावल) हे त्यांच्या घराच्या तळघरात गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले.
पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे 65 किलो गोमांस, लोखंडी कुऱ्हाड, कोयता, सुरा, लाकडी कुंदा, वजनकाटा, वजनमापे तसेच काळ्या रंगाच्या पॉलिथिन पिशव्या जप्त केल्या. याशिवाय तळघरात बांधून ठेवण्यात आलेल्या दोन गायी, दोन गोऱ्हे आणि तीन म्हैसवर्गीय जनावरांची सुटका करून त्यांना पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्यात आले.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 292/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) मधील कलम 5, 5(अ), 5(ब), 5(क), 9, 9-अ आणि 11 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चारही आरोपींना 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 सैय्यद रशीद निसार कुरेशी याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. यावल पोलीस ठाण्यात 2025 मध्ये गोमांस विक्रीसंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच 28 मे 2026 रोजी बकरी ईदच्या दिवशी कत्तलीच्या उद्देशाने आठ गोवंश जनावरे बांधून ठेवल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 208/2026 दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच आरोपींनी पुन्हा त्याच ठिकाणी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस तपासात आरोपी रशीद कुरेशी याने त्याच्या भावांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी वारंवार प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 112 अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सफौ/ विजय पाचपोळे, पोहेकॉ/रोहिल गणेश, पोकॉ/ पुरुषोत्तम पाटील, पोकॉ/अनिल साळुंखे, पोकॉ/ हितेश बागुल, पोकॉ मोहन, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील तसेच होमगार्ड विशाल बारी, मधुकर पारधे, विजय बढे, महेंद्र माळी, नितीन कोळी आणि रामचंद्र सपकाळे यांनी सहभाग घेतला.








