नांदेड (प्रतिनिधी: मोसिन शेख):अवैध रेती (गौण खनिज) वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला. या कारवाईत एकूण ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10.50 वाजता वासरी चौक ते आमदुरा रोडदरम्यान अवैध रेती वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. तपासादरम्यान एमएच-14 एमपी-4264 क्रमांकाचा हायवा थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.
यावेळी चालकाची ओळख संदीप विलास कदम (वय 26, रा. पुयडवाडी, नांदेड) अशी झाली. वाहनामध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना सुमारे 5 ब्रास रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹35 लाख किंमतीचा हायवा आणि ₹25 हजार किमतीची रेती असा एकूण ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 47 व 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व त्यांच्या पथकाने केली. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.








