जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत मुद्देमालाची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे.
दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते २७ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजेदरम्यान दत्तनगर, मेहरुण येथील फिर्यादी मीसमीर खान नईम खान तसेच शेरा चौक येथील फारुख इकबाल बागवान यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या मोटारसायकली अज्ञात चोरट्याने लंपास केल्या होत्या. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकली न मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. ६२६/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडे सोपविण्यात आला. पथकाने घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवली.
दि. २८ जुलै २०२६ रोजी तांबापुरा, मेहरुण परिसरात सापळा रचून साहील मोहम्मद तडवी (वय २३, रा. तांबापुरा, मच्छी बाजार, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून एमएच-१९ बीपी-४७९४ क्रमांकाची हिरो एचएफ डिलक्स (किंमत अंदाजे ₹३० हजार) तसेच एमएच-१९ एएम-१६७० क्रमांकाची हिरो एचएफ डिलक्स (किंमत अंदाजे ₹१५ हजार) अशा एकूण ₹४५ हजार किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
अटक आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रमेश चौधरी, पोना प्रदीप चौधरी तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.








