पहूर(प्रतिनिधी: मुकेश): पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीचा गुन्हा उघडकीस आला. या कारवाईत दोन बैल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पिंपळगाव गोलाईत शिवारातील गट क्रमांक १०७ मधून शेतकऱ्याच्या मालकीची मावळी जातीची, पांढऱ्या रंगाची दोन बैल चोरीस गेले होते. या बैलांची किंमत १ लाख ५ हजार रुपये होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सोनाळा, ता. जामनेर येथील दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी साथीदारांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली बैलजोडी सुनसगाव येथील एका व्यापाऱ्याला विकल्याची माहितीही तपासात समोर आली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सुनसगाव येथे जाऊन तपास केला असता, चोरीस गेलेली बैलजोडी एका शेतात आढळून आली. पोलिसांनी बैलजोडी हस्तगत करून ती मूळ मालकाच्या ताब्यात दिली. तसेच चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
२ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत १ लाख ५ हजार रुपये किमतीची बैलजोडी आणि अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा विनानंबरचा मालवाहू टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, चोरीच्या घटनेतील इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.

