नागद (प्रतिनिधी : संतोष परदेशी):पांगरा-लोझा शिवारात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात बांधलेल्या पाळीव गाईवर हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोझा शिवारातील गट क्रमांक ५ मध्ये शेतकरी योगेश प्रकाश परदेशी यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात बांधलेल्या गाईवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे परिमंडळ अधिकारी एस. एस. डावखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
परिसरात बिबट्याचा वावर वाढत असल्याने पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित परिसरात तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

