जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी घडली. या प्रकरणातील तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. याप्रकरणी एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी बुद्रुक येथील शिवनगर परिसरात राहणारे किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१) हे भंगार व्यवसायासह पानटपरी चालवतात. शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ आनंद पाटील (वय २४), हर्षल शिंदे (वय २०), गौरव पाटील (वय २०) आणि एका विधिसंघर्षित बालकाने बाविस्कर यांच्याकडे उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून वाद घातला.
या वादातून आरोपींनी बाविस्कर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आनंद पाटील याने कोयत्याने, तर हर्षल शिंदे याने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी बाविस्कर यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित केली. गोपनीय माहितीच्या आधारे आनंद हरी पाटील, हर्षल रविंद्र शिंदे आणि गौरव विनोद पाटील या तिघांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.
पोलिसांचे मार्गदर्शन व तपास पथक
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

